पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम
७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीचे सौंदर्य
प्रसाद पारावे : रायगड
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी परिवाराचा 77वा वार्षिक संत समागम 16, 17 व 18 नोव्हेंबर, 2024 ला आयोजित होत आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ असतो. सर्वविदित आहे, की या संत समागमाची भव्यता ही केवळ त्याच्या क्षेत्रफळाने अधोरेखित होत नाही, तर त्याचे इंगित याठिकाणी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तगणांच्या भावनेमध्ये साठलेले आहे. निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जिथे धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब-श्रीमंत आदि बंधनांच्या पलीकडे जाऊन सकळजन मर्यादेत राहून प्रेम आणि सौहार्दपूर्ण भावाने सेवा, सिमरण आणि सत्संग करतात. हे त्याच संदेशाचे अनुसरण आहे जो समस्त संतांनी, गुरु-पीरांनी वेळोवेळी दिलेला आहे. या तीन दिवसीय संत समागमामध्ये भक्तिच्या अनेक पैलुंवर गीत, विचार आणि कविता आदि माध्यमातून भक्तगण आपले शुभभाव प्रकट करतील. सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरुपी अमूल्य उपहाराचादेखील सर्वांना लाभ होणार आहे. यावर्षी सतगुरु माताजींनी समागमाचा विषय दिलेला आहे – ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ (विस्तार, असीम की ओर).
विशाल रूपात आयोजित होणारा निरंकारी संत समागम प्रभावशाली आणि सुरळीतपणे आयोजित करण्यासाठी निरंकारी मिशनचे भक्त व सेवादार देशाच्या कानाकोपऱ्यातून काही महिने अगोदरपासून येऊन आपल्या निष्काम सेवा समर्पित करत समागमाच्या पूर्वतयारी मध्ये आपले योगदान देत राहतात. समागम सेवांचे हे दृश्य स्वयमेव अत्यंत प्रेरणादायी आणि मनोहर असते. यावर्षीही हेच दिसून आले, की सकाळपासूनच सेवांना सुरवात केली जाते ज्यामध्ये सर्व वयोगटातील नर-नारी सहभागी होऊन अनेक प्रकारच्या सेवा करत आहेत. सेवादार भक्तांच्या हातामध्ये मातीची घमेली असतात आणि मुखामध्ये भक्तीभावनेने ओतप्रोत मधुर गीतांचे गायन होत असते. कुठे जमीन समतल केली जात आहे तर कुठे तंबू उभारले जात आहेत. सेवादल वर्दीमध्येही अनेक नौजवान बंधु-भगिनी आपापल्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मैदानावर विविध सेवांमध्ये व्यग्र आहेत. लंगर, कॅन्टीन, प्रकाशन यांसारख्या अनेक सुविधा व्यवस्थितपणे चालू आहेत ज्यांचे स्वरूप नजिकच्या दिवसांत आणखी विशाल होत जाणार आहे. पहायला गेले तर हा सामाजिक उपक्रम वाटत आहे; परंतु त्याचा आधार पूर्णपणे आध्यात्मिक आहे. सगळे एकमेकांमध्ये परमात्म्याचे रूप पाहून एकमेकांच्या चरणांवर ‘धन निरंकार जी’ असे म्हणून झुकत आहेत. ‘विद्या ददाति विनयम’ या वचनाचे हे जीवंत उदाहरण प्रतीत होत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर एक दैवी चैतन्य विलसत आहे जे त्यांच्या मनातील विश्वास आणि समाधान प्रकट करत आहे. सेवा करणाऱ्या या भक्तांच्या आनंदाची पराकाष्ठा तेव्हा पहायला मिळते जेव्हा सेवा करत असताना त्यांना आपल्या सद्गुरुंचे दर्शन होते. त्या क्षणी भक्तगणांची हृदये आनंदाचे झोके घेऊ लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात. याच स्वर्गीय दृश्याची ते वर्षभर प्रतीक्षा करत असतात.
संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समागमाचे समन्वयक श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी सांगितले, की सर्व संतांच्या निवासाची, भोजनाची, स्वच्छता गृहांची, आरोग्याची, सुरक्षेची, आगमन-प्रस्थानाची व इतर सर्व मूलभूत सुविधांची तयारी केली जात आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य लाभत आहे. समागमाच्या आयोजनाशी संबंधीत सर्व वैधानिक पैलू लक्षात घेऊन सारी व्यवस्था करण्यात येत आहे. थोड्याच दिवसांत हे आध्यात्मिक स्थळ ‘भक्तीच्या नगरी’चे रूप धारण करेल जिथे जगभरातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येऊन सहभागी होतील. मानवतेच्या या महासंगमामध्ये समस्त धर्म-प्रेमी बंधु-भगिनींचे हार्दिक स्वागत आहे.