Latest Kokan News: विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर निवडणूक लढवत असून आता पक्षाने रायगड जिल्ह्यातही एन्ट्री घेतली आहे. पनवेल व श्रीवर्धन मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणादेखील केली आहे.
त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
मागील लोकसभा व इतर निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका संदिग्ध राहिल्याने कार्यकर्तेदेखील संभ्रमात होते; परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात पनवेल व श्रीवर्धन या दोन मतदारसंघांमध्ये मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पनवेलमधून योगेश चिले यांना उमेदवारी देण्यात आली असून श्रीवर्धनमधून फैजल पोपरे निवडणूक लढवणार आहेत.
यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य मतदारसंघांमध्ये आता तिरंगी व चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेनाने शेतकरी कामगार पक्षाविरोधात आपले उमेदवार उभे केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार मिळत नसतानाही मनसेने मात्र श्रीवर्धनमधून फैजल पोपरे यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. पोपरे यांचा श्रीवर्धन, माणगाव व म्हसळा या तालुक्यांमध्ये दांडगा संपर्क असून ते या भागात सातत्याने कार्यरत आहेत. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असल्याने मुस्लिम मते या ठिकाणी निर्णायक असतात, याचा विचार करून मनसेने या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिला आहे. यामुळे मनसेची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून आहेत.
अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ पनवेल, श्रीवर्धनमधील उमेदवारीमुळे मात्र दूर झाली आहे.