मुंबई : निकाल विलंब असो किंवा परीक्षा गोंधळ आदी विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ नेहमीच चर्चेत असते. मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ हिवाळी सत्राअंतर्गत प्रथम वर्ष विधि शाखेच्या प्रथम सत्र परीक्षेत ‘लेबर लॉ ऍण्ड इंडस्ट्रियल रिलेशन’ या विषयाची प्रश्नपत्रिका ही नवीन अभ्यासक्रमाऐवजी जुन्या अभ्यासक्रमानुसार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ हिवाळी सत्राअंतर्गत प्रथम वर्ष विधि शाखेची प्रथम सत्राची ‘लेबर लॉ ऍण्ड इंडस्ट्रियल रिलेशन’ या विषयाची परीक्षा बुधवारी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात आली. ही परीक्षा ७५:२५ या
पॅटर्ननुसारच्या परीक्षेला ६०:४० या जुन्या पॅटर्नच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली. आम्ही हा प्रकार तात्काळ विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकारचे परीक्षा गोंधळ व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षा विभागात सक्षम अधिकारी असावेत, असे एका शिक्षकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, ‘प्रथम वर्ष विधि शाखा सत्र १ या परीक्षेतील ‘लेबर लॉ अॅण्ड इंडस्ट्रियल रिलेशन’ या विषयाच्या नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली, अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालयांमार्फत विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारीची शहानिशा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.
‘अभ्यास मंडळाच्या बैठकीत विधि शाखेच्या अभ्यासक्रमात काही बदल करण्यात आले. मात्र प्राध्यापकांमध्ये समन्वय नसल्यामुळे आणि बेजबाबदारपणामुळे जुन्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाली. या गोंधळाबाबत सखोल चौकशी झालीच पाहिजे. विद्यापीठाने परीक्षा व मूल्यमापन मंडळातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी करावी. ज्यांच्यामुळे हे प्रकरण घडले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास नवीन प्रश्नपत्रिका काढून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी’, असे शिंदे गटाच्या युवा सेनेचे उपसचिव अॅड. सचिन पवार यांनी सांगितले.