ए.आय. तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे याबाबत तज्ञ मार्गदर्शक करणार मार्गदर्शन
महाड : रघुनाथ भागवत
पत्रकारितेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून या बदलत्या पत्रकारितेवर आणि या क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक व नव्याने दाखल झालेल्या तरुण पत्रकारांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सदर कार्यशाळा महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील बहुउद्देशीय सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळा दक्षिण रायगडमधील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आली आहे. सध्या पत्रकारितेमध्ये नवनवे बदल होताना दिसत आहेत. त्यातच आता सोशल मीडियाची देखील भर पडली आहे. यामुळे युट्युबवर अनेक वृत्तवाहिन्या निर्माण झाल्या आहेत. या वृत्तवाहिन्यांमधून पत्रकारीतेचे कोणतेच ज्ञान नसलेले अनेक तरुण काम करताना दिसत आहेत. अशा नवोदित तरुणांना तसेच पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करू इच्छित असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता दिनांक १८ जानेवारी रोजी महाड पत्रकार संघातर्फे कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
यामध्ये ए. आय. या तंत्रज्ञानाचा पत्रकारांसाठी किती फायदा आणि किती तोटे याबाबत तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर नवोदित पत्रकारांना देखील पत्रकारितेविषयी अनुभवी पत्रकारांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे असे महाड पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वांनाच सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याकरीता इच्छुकांनी तसेच नवोदित पत्रकारांनी आपली नावे महाड पत्रकार संघाचे उदय सावंत ९७६३६७८०५३, श्रीकांत सहस्रबुद्धे ९४२२६८९३६३, रघुनाथ भागवत ९४२१६७६३३६ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केले आहे.