खरसई : विनय शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, खरसई येथे इयत्ता 8 वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत एक आनंददायी आणि प्रेरणादायक वातावरणात पार पडले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या उमेदीनं झळकत होती.
कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशुराम मांदाडकर, आगरी समाज अध्यक्ष महादेव नाक्ती, सचिव रामचंद्र मांदारे, तुकाराम मांदाडकर, कानू शितकर, निलेश मांदाडकर, आणि हेमंत पयेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत झाले.
राज्य सरकारच्या शिक्षण धोरणानुसार नवागत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या प्रसंगी समाजसेवेचा आदर्श ठेवत शैलेशकुमार पटेल यांनी शाळेला दोन पंख्यांचे दान करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी आणि पालकांनी कौतुक केले.

या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शैक्षणिक वाटचालीची सुरुवात एक सकारात्मक पायरीवर झाली आहे.