प्रतिनिधी महामुंबई
माहिम, दादर आणि प्रभादेवीतील विधानसभा निवडणुकीत जनता जो कौल दिला, तो मी विनम्रपणे स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी निवडणूक निकालावर व्यक्त केली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी या पराभवाला एक नवा अध्याय समजत लोकांसाठी अधिक मेहनत घेण्याचे वचन दिले आहे.
“गेली अनेक वर्षे या प्रभागातील लोकांच्या मूलभूत गरजांसाठीचा संघर्ष मी पाहिला आहे. त्या संघर्षातून प्रेरित होऊन प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी मी या निवडणुकीत उतरलो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळं होतं,” असे नम्र शब्दांत त्यांनी जनतेच्या निर्णयाचा आदर केला.
“लढाई राजपुत्राची नव्हे, सामान्य कार्यकर्त्याची”
आपल्या लढाईचे स्वरूप स्पष्ट करताना अमित ठाकरे म्हणाले, “माझी ही लढाई कधीच सत्तेसाठी नव्हती. ती एका सामान्य कार्यकर्त्याची होती, जो जनतेच्या भल्यासाठी झटतो. माझं ध्येय फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणण्याचं आहे.”
“आजचा कौल म्हणजे नवी सुरुवात”
निकालाला पराभव म्हणून न पाहता त्यांनी या कौलाला एक नवा अध्याय मानले आहे. “आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; उलट, एक नवी सुरुवात आहे. माहिम, दादर, प्रभादेवी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अहोरात्र झटत राहीन, हा माझा शब्द आहे,” असे ते म्हणाले.
मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त
ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले, त्यांचे आभार मानत अमित ठाकरे यांनी त्यांचा विश्वास वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. “तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या विश्वासाला खरे उतरण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे त्यांनी सांगितले.
अमित ठाकरे यांनी या निवडणुकीत दाखवलेला लढा आणि त्यांच्या पोस्टमधून व्यक्त केलेला प्रामाणिकपणा जनतेच्या मनावर नक्कीच ठसा उमटवणारा आहे. आता पुढील काळात त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्तता कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.