मुंबई शहर व उपनगरातील विधानसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात स्पर्धा लागली असून एका विधानसभेसाठी ४ ते ५ जण इच्छुक आहेत.शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदारांसह माजी नगरसेवक शिंदे गटात गेले.
मात्र अनेक पदाधिकारी व शिवसैनिक ठाकरे गटाकडेच राहिले. विशेषतः मुंबईत ठाकरे गटाकडेच कार्यकर्त्यांची मोठी ताकद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ठाकरे गटात स्पर्धा लागली आहे. मुंबईत विद्यमान आमदार असलेल्या विधानसभेसह अन्य ५ ते ६ विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यात वेसावे, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, घाटकोपर पश्चिम, दहिसर या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत ठाकरे गटातील किमान ४ ते ५ जण इच्छुक आहेत. त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न ठाकरे गटातील नेत्यांसह खुद्द मातोश्रीला पडला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांशी सध्या वरिष्ठ नेत्यांमार्फत बोलणी सुरू आहेत.
वेसावे विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटात मोठी स्पर्धा लागली आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल, माजी नगरसेवक राजू पेडणेकर व शाखाप्रमुख हारून खान स्पर्धेत आहेत. सर्वच इच्छुकांचे आपापले विभागात वर्चस्व असल्यामुळे या इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्यांना पडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब स्वतः इच्छुकांशी संवाद साधत आहेत; परंतु अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही.
ठाकरे गटातील नव्या चेहऱ्यांना संधी
मुंबईत शिंदे गटाचे सहा आमदार होते. यापैकी जोगेश्वरी मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर खासदार बनले. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार असलेल्या जोगेश्वरीसह मागाठाणे, चांदिवली, माहीम, कुर्ला व भायखळा या मतदारसंघांत ठाकरे गटातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. पण येथील विद्यमान आमदारांशी लढत देण्यासाठी ठाकरे गटाला तगडा पर्याय शोधावा लागणार आहे.