मुंबई : महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटना त्यांचा संप मागे घेणार आहेत. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची 5 हजार रुपयांची वेतन वाढीची मागणी असताना सरकारने मूळ वेतनात साडेसहा हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही संपावर जावू, अशी भूमिका घेऊन एसटी कर्मचारी कृती समितीने सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, अशी विनंती मंत्री उदय सामंत यांनी केली. सोमवारी कृती समिती आणि उदय सामंत यांच्यात तासभर चर्चा झाली. परंतु बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याने मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ मिळावी या आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत.