बईः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर जात आहे. त्यापूर्वी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली.मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती येत आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नसल्याने कर्मचारी उद्यापासून संपावर जाऊ शकतात.
ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, यासाठी उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संपावर ठाम, अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका आहे.
एसटी कर्मचारी कृती समितीकडून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. दुसरीकडे बुधवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचा इशारा
आज रात्री पगारवाढीची घोषणा झाली नाही तर आज रात्रीपासून राज्यभरातील सर्व एस टी कर्मचारी संपावर जातील, असा इशारा सत्ताधारी पक्षातील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, आम्ही सरकारी पक्षात असलो तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत. अधिकाऱ्यांना सुचना देऊनही ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. आम्हांला कोणालाही अडचणीत आणायच नाही, आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही पण जर सुचना देऊनही महिनाभर का पगारवाढ झाली नाही?