भावेश जनार्दन म्हसकर
क्रीडाजगत हे माझ्यासाठी फारसे आकर्षणाचे क्षेत्र नव्हते. खेळांची नावं, त्यांचे नियम, खेळाडूंची नावे—हे सारे माझ्यासाठी कुठेतरी अनोळखीच होते. पण एका व्यक्तीमुळे मी कधी नकळत या विश्वाकडे पाहू लागलो—त्यांचे नाव द्वारकानाथ संझगिरी.
तुम्हला पाहिलं, ऐकलं, समजून घेतलं ते ABP (तेव्हाच्या स्टार) माझाच्या माध्यमातून. आणि मग ते सतत ऐकत राहावं असं वाटायला लागलं.
तुमचं लिखाण वाचताना असं वाटतं, जणू मी स्वतः स्टेडियममध्ये बसून सामना पाहतोय. क्रिकेटसारख्या खेळाच्या गूढ संकल्पना सहजसोप्या करायच्या तुमच्या शैलीने, त्यामागच्या कहाण्यांनी आणि किस्स्यांनी, एक नवा दृष्टीकोन मिळाला. तुमचा प्रत्येक लेख, प्रत्येक वाक्य, माहितीच्या कक्षेत घेऊन जाणारे आणि त्यासोबतच हसवत नेणारे असे असे. तुमच्या लेखनात फक्त आकडेवारी नसायची, तर भावना असायच्या.
तुम्ही क्रीडा पत्रकारितेला एक वेगळं वळण दिलं. खेळाडू हे फक्त रेकॉर्डब्रेक करणारे यंत्र नाहीत, तर त्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो, हुरहूर असते, जिद्द असते—हे तुम्ही शिकवलं. तुमच्या शब्दांतली ती जादू, तो ओघ, तो सहजपणा—हे सगळं मनाच्या कोपऱ्यात कायम राहणार.
आज तुमच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. क्रिकेटचं आणि क्रीडा समीक्षणाचं एक सोन्याचं पान काळाच्या पुस्तकात कायमचं मिटलं आहे. माझ्यासारख्या असंख्य वाचकांसाठी, ज्यांनी त्यांच्यामुळे खेळांकडे बघायला सुरुवात केली, त्यांच्यासाठी ही कधीही भरून न निघणारी हानी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली, द्वारकानाथ संझगिरी सर! तुमचे शब्द आमच्यासोबत कायम राहतील.