दोन दिवसांत ७ जणांना चावा; नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर संताप
श्रीवर्धन । श्रीवर्धन शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अवघ्या दोन दिवसांत सात नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील नाका, मुख्य रस्ते तसेच वर्दळीच्या भागांत भटक्या श्वानांची टोळकी मोकाट फिरताना दिसत आहेत. एकटे जाणाऱ्या नागरिकांवर अचानक झडप घालून हल्ले करण्याच्या घटना वाढल्या असून नागरिक अक्षरशः दहशतीत जीवन जगत आहेत. विशेषतः सकाळ संध्याकाळच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “आज ७जण जखमी झाले, उद्या जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? नगरपरिषद झोपली आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी जीवना बंदर आणि दांडा परिसरातही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या
त्यावेळीही तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या; मात्र कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयश आल्याने ही समस्या पुन्हा डोके वर काढत आहे.
दरम्यान, पिसाळलेल्या श्वानांवर कारवाई करताना प्राणीप्रेमी संघटनांचा दबाव येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिक स्वतःह्न पुढाकार घेण्यास घाबरत असून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पकड मोहीम राबवणे, निर्बीजीकरण करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर घरत आहे.













