नवी मुंबई – पालिकेने गुरुवारी घेतलेला शटडाऊन व सीवूडस् सेथील मुख्य जलवाहिनीवरील गळतीच्या कामाला झालेला विलंब यामुळे शुक्रवारी सकाळी शहरात पाणीपुरवठा करता आला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांचे पाण्याविना चांगलेच हाल झाले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करण्यासाठी गुरुवारी नवी मुंबई महापालिकेने शटडाऊन घेतला होता. त्यामुळे गुरुवारी २६ सप्टेंबरला सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा १० तास बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबरोबरच कामोठे व खारघर नोडमधील पाणी पुरवठा बंद राहणार होते. तसेच शुक्रवारी २७ सप्टेंबरला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोडमधील नागरीकांना नवी मुंबई महापालिकेच्यावतीने याकालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
परंतु बुधवारीच सिवूड्स येथील अक्षर चौक येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास मोरबेवरून दिघ्याकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर गळती सुरु झाली होती. पालिकेने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या वरच सायकल ट्रॅक बनवल्यामुळे हे काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सीवूडस् येथील गळती दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी ७.४५ पर्यंत सुरू होते त्यामुळे मुख्य जलवाहिनीद्वारे मोरबे भोकरपाडा येथून पाणीपुरवठा सुरू न करता आल्यामुळे शुक्रवारीही सकाळी शहरात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे पालिकेने गुरुवारी घेतलेला शटडाऊन व सीवूडस् सेथील मुख्य जलवाहिनीवरील गळतीच्या कामाला झालेला विलंब यामुळे शुक्रवारी सकाळी शहरात पाणीपुरवठा करता आला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांचे पाण्याविना चांगलेच हाल झाले. पालिकेने शुक्रवारी संध्याकाळी नियमितपणे पाणीपुरवठा होईल अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोकसत्ताला दिली आहे.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या व पामबिचमार्गालगतहून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरच महापालिकेने सायकल ट्रॅक बनवण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरून येणाऱ्या मुख्य वाहिनीवर बनवलेल्या सायकल ट्रॅकमुळे भविष्यात पालिकेला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.