Mumbai Mahalakshmi Mandir : महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. अरबी समुद्राच्या काठावर भुलाभाई देसाई मार्गावर असलेले हे मंदिर कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.
महालक्ष्मी मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे. या मंदिरात तीन अतिशय सुंदर मूर्ती आहेत. गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती एकत्र आहेत. तीनही मूर्ती सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या बांगड्या आणि मोत्याच्या हारांनी सुंदररित्या सजविल्या आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव कामही आहे. मंदिर संकुलामध्ये विविध देवतांच्या आकर्षक पुतळे आहेत.
मंदिराचा इतिहास
मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे. जेव्हा ब्रिटीशांनी महालक्ष्मी प्रदेश वरळी प्रदेशाला जोडण्यासाठी ब्रीच कॅण्डी मार्ग बनवण्याची योजना आखली तेव्हा समुद्राच्या वादळी लाटांमुळे त्या कामात एकसारखी विघ्ने येऊ लागली. त्यावेळी देवी लक्ष्मी एक ठेकेदार रामजी शिवाजीच्या स्वप्नात आली आणि समुद्रातून देवीच्या तीन मूर्ती काढून मंदिरात स्थापित करण्याचा आदेश दिला. रामजींनीही तेच केले आणि ब्रीच कँडी मार्ग यशस्वीरीत्या तयार झाला.
देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते. घर आणि व्यवसायात सुख-समृद्धी आणण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली जाते. मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती एकत्र आहेत. तिन्ही मुर्त्या सोन्या आणि मोत्याच्या दागिन्यांनी सजवलेल्या आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा ठाम विश्वास आहे की आई नक्कीच आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल.सामान्यत: भाविक महालक्ष्मीची मुख्य मूर्ती पाहू शकत नाहीत, कारण दिवसा त्या मूर्तीवर मुखवटा चढवलेला असतो. येथील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मूळ मूर्ती पाहण्यासाठी रात्री इथे यावे लागते. रात्री 9.30 च्या सुमारास मूर्तीवरील मुखवटा हटवला जातो. 10 ते 15 मिनिटांनंतर पुन्हा तो मुखवटा चढविला जातो.
नाणे चिकटल्याने पूर्ण होतात इच्छा
मूर्तीचे वास्तविक रूप फारच थोड्या लोकांना दिसू शकते. रात्री मुखवटा चढविल्यानंतर मंदिराचा दरवाजा बंद होतो. सकाळी स्वच्छता झाल्यानंतर मातांचा अभिषेक होतो आणि त्यानंतर देशभरातून आलेल्या दर्शकांच्या पुजेसाठी देवी पुन्हा सज्ज होते.मंदिरात एक भिंत आहे, जिच्यावर तुम्हाला पुष्कळ नाणी दिसतील. असे म्हणतात की येथे भक्त त्यांच्या इच्छेनुसार नाणी चिटकवतात. असे म्हटले जाते की मनापासून केलेली प्रत्येक इच्छा येथे पूर्ण होते.