महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्राबरोबर मुंबईच्या निकालाकडेही सगळ्यांच लक्ष लागलं आहे. मुंबई कोणाची? याचा आज निर्णय होईल. काही वर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेच एकहाती वर्चस्व होतं.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कामकाज पहायचे, त्यावेळी सगळ्या मुंबापुरीत शिवसेनेचा आवाज होता. पण आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. मुंबईत आता भाजपाने सुद्धा आपला जनाधार वाढवला आहे. मागच्या दोन विधानसभा 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत हे दिसून आलं. मुंबईत विधानसभेचे एकूण 36 मतदारसंघ आहेत. यात मुंबई उपनगरात 26 आणि मुंबई शहरात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 साली शिवसेना एकसंध असताना शिवसेना-भाजपाने युती म्हणून एकत्र निवडणूक लढवली. त्यावेळी युतीने एकूण 29 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपा यांच्या वाट्याला फक्त सात जागा आल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेचे 14 आणि भाजपाचे 16 आमदार निवडून आले होते.
आज जाहीर होणाऱ्या निकालात शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोण चांगलं प्रदर्शन करतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदर्शन कसं असेल? याकडे राज्याच लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जागा जिंकणार? की मत विभाजनाने खेळ बिघडवणार? हे सुद्धा महत्त्वाच ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केले नव्हते, त्यामुळे मनसेची सध्याची ताकद काय? याचा कोणालाच अंदाज नाहीय. मुंबईत 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत.
मुंबईत किती जागांवर शिवसेना शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट सामना?
महाविकास आघाडीत मुंबईत उद्धव ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांचे 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गट 15 आणि भाजपाने 18 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 3 जागा आहेत. मुंबईत 11 जागांवर शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असा थेट सामना आहे. 9 जागांवर उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना आहे. भाजप आणि काँग्रेस सात जागांवर आमने-सामने आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईत कोणी जास्त जागा जिंकल्या?
लोकसभा निवडणूक 2024 चे मुंबईतील निकाल बघितले, तर विधानसभा क्षेत्रनिहाय 36 पैकी 20 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे, तर 16 विधानसभा क्षेत्रात महायुतीला लीड आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 4 तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. यात शिवसेना ठाकरे गटाचे तीन आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून आला. महायुतीमध्ये भाजपाने एक आणि शिंदे गटाने एक जागा जिंकली.