परशुराम रामचंद्र मांदाडकर यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!
वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत असताना मागे वळून पाहिलं की, आयुष्याचं प्रत्येक पाऊल समाजासाठी वाहिलेलं, संघर्षमय पण सन्माननीय वाटचाल करत आलेलं दिसतं हेच परशुराम रामचंद्र मांदाडकर यांचं जीवन..!
खरसई गावात रामचंद्र मालू मांदाडकर यांचे सुपुत्र म्हणून जन्मलेल्या परशुरामजींनी शिक्षण सातवीपर्यंत घेतलं असलं, तरी खरी शाळा होती ती समाजाची, कष्टांची आणि जिद्दीची…… वडिलांकडून मिळालेला प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि मिळालेली शिस्त व चिकाटी, हे संस्कार त्यांनी आपल्या जीवनात खोलवर रुजवले…. अवघ्या १४व्या वर्षी समाजकारणात सक्रिय होऊन त्यांच्या कार्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजाच्या प्रत्येक अंगाला पूर्ण निष्ठेने हात लावला…!!!
तरुणांना घडवणारे दूरदृष्टीचे नेते
खरसई गावात परशुरामजींनी खेत्रीपाल क्रीडा मंडळ आणि दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळाच्या माध्यमातून तरुणांना संघटित केलं, त्यांच्यात सामाजिक भान जागृत केलं. कबड्डी हा त्यांचा आवडता खेळ होता आणि त्यांनी हाच खेळ तरुण पिढीच्या शारीरिक व मानसिक उभारणीत एक प्रभावी साधन म्हणून वापरला.
आगरी समाजाचा कणखर आधारस्तंभ
पी. आर. मांदाडकर साहेब केवळ गावापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या कार्याचा विस्तार आगरी समाजाच्या व्यापक हितासाठी झाला. त्यांनी खरसई आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष व सचिव या पदांवर कार्य केले. विशेष म्हणजे म्हसळा-श्रीवर्धन तालुका १८ गाव आगरी समाज संघटना स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. या संघटनेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला आणि नव्या पिढीसाठी मार्गदर्शनाची दीपमाळ प्रज्वलित केली. त्यांचे हे कार्य आगरी समाजाला एकजुटीने पुढे घेऊन जाण्यात अत्यंत मोलाचे ठरले आहे. ते अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे संस्थापक सदस्य आणि आगरी समाज संघटनेचे सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.
गावाचा सरपंच ते जिल्हास्तरीय नेतृत्वः विकासाचा मंत्र
खरसई ग्रामपंचायतीचे सलग १५ वर्ष सरपंच म्हणून त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास केला. १९८१ मध्ये खरसई येथे हायस्कूल स्थापन करून शिक्षणाची गंगा गावात आणली. अनेक वर्ष त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, शेती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी दूरदृष्टीने उपाययोजना राबवल्या.
त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५ वर्ष संचालक, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, तसेच खरसई विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. सहकार चळवळीचा पाया मजबूत करताना त्यांनी शेतकरी, कामगार आणि छोट्या उद्योजकांचे आर्थिक हित जपले.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुका चिटणीस म्हणून काम करताना त्यांनी पक्ष विस्ताराकरिता अमुल्य योगदान दिले. शेतकरी, धरणग्रस्त आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. पेण येथे मिठावरील अन्यायकारक कराविरुद्ध त्यांनी कबड्डीच्या माध्यमातून अनोखे आंदोलन केलं, जे आजही तेथील लोकांच्या स्मरणात आहे. पी. आर. मांदाडकर साहेब हे सुशासनाचा खरा अर्थ तळागाळात पोहोचवणारे कार्यकर्ते आहेत.
शेकाप म्हसळा तालुका चिटणीस असताना त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली दोन पंचायत समिती सदस्य, दोन जिल्हा परिषद सदस्य तसेच म्हसळा तालुक्यातील 20 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर सरपंच निवडून आणले होते
संघर्ष आणि त्यागाची गाथा
आणीबाणीच्या काळात त्यांनी कोल्हापूर आणि कर्नाटकात भूमिगत राहून लोकशाहीसाठी कार्य केलं – याची शासन दरबारी नोंद नसली, तरी त्यांच्या सहकारी मित्रांच्या हृदयात आजही त्यांचं ते कार्य कोरलं गेलं आहे.
त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी आपले वैचारिक ठामपण जपले. प्रारंभी बॅ. ए. आर. अंतुले यांचे समर्थक म्हणून काँग्रेसमध्ये कार्यरत असले तरी, पुढे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. दि.बा. पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, जयंत पाटील, रामशेठ ठाकूर, मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, दत्तूशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामान्य जनतेसाठी, विशेषतः शेतकरी, कामगार, धरणग्रस्त व वंचित घटकांसाठी काम केले.
कला, क्रीडा, अध्यात्म आणि सामाजिक न्यायनिवाडा
पी. आर. मांदाडकर साहेब हे केवळ राजकीय व सामाजिक नेते नव्हते, तर ते एक नाट्यप्रेमी, कबड्डीप्रेमी आणि भजनप्रेमी कार्यकर्तेही आहेत. त्यांनी जीवनदीप सामाजिक क्रीडा संस्थेचे ते संस्थापक आहेत, ही संस्था शासन दरबारी कार्यरत आहे. तसेच ते श्री काडसिद्धेश्वर महाराजांचे श्रद्धावान अनुयायी असून अध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय राहिले आहेत.
गावात तसेच पंचक्रोशीत सामाजिक न्यायनिवाडा करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक कौटुंबिक, सामाजिक व मालमत्तेचे वाद त्यांनी समजूतदारपणे निकाली लावले. हे काम त्यांनी कोणत्याही पद, प्रतिष्ठा, कीर्तीच्या अपेक्षेशिवाय केले….!!!
एक प्रेरणास्रोत व्यक्तिमत्त्व
परशुराम रामचंद्र मांदाडकर हे नाव केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नाही ते एक विचार आहे, एक चळवळ आहे आणि एक समाजाशी असलेली नाळ आहे. त्यांनी ज्या सातत्याने, निष्ठेने आणि निस्वार्थ भावनेने सेवा केली आहे, ती नव्या पिढीसाठी एक आदर्श ठरते. त्यांचे आयुष्य हे खरंच एक ‘सामाजिक साधनेसारखं’ आहे.
त्यांच्या जीवनातील संघर्ष, सातत्य, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक न्यायासाठीची भूक, आणि सामान्यांसाठीचं प्रेम हे सगळं शब्दात मावणं कठीण आहे. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांच्या कार्याचा गंध खरसई, म्हसळा तालुका, रायगड जिल्हा आणि संपूर्ण आगरी समाजात दरवळतो आहे.
अ.क्र. पदाचे नाव संस्थेचे नाव कार्यकाळ
1 अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटना १९७४ ते १९७७
2 उपाध्यक्ष म्हसळा तालुका युवक काँग्रेस संघटना १९७४ ते १९८५
3 सचिव १७५ गाव आगरी समाज संस्था १९७६ ते १९७७
4 सरपंच ग्रामपंचायत खरसई १९७७ ते १९९२
5 अध्यक्ष विनय शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल खरसई १९८५ ते …
6 उपाध्यक्ष म्हसळा तालुका शेतीकरी सहकारी पतसंस्था १९९९ ते २००५
7 संचालक दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग १९९९ ते २००२
8 चेअरमन महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघ जि. रायगड २००० ते २००७
9 चेअरमन म्हसळा तालुका खरेदी विक्री संघ २००३ ते २००६
10 अध्यक्ष तंटामुक्ती समिती ग्रामपंचायत खरसई १९९८ ते २००६

अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!!
आज, त्यांच्या जीवनातील अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीच्या या मंगल प्रसंगी, त्यांना हार्दिक
शुभेच्छा देताना आम्हाला अभिमान वाटतो.
“तुमच्या विचारांचा प्रकाश नवनव्या पिढ्यांपर्यंत पोहोचो,
तुमचं कार्य सतत प्रेरणा देत राहो,
तुमचं आरोग्य उत्तम राहो,
आणि तुमचं आयुष्य अजून अधिक फलदायी आणि यशस्वी ठरो !”
पी. आर. मांदाडकर साहेब, तुम्ही आमच्यासाठी नेते नाही, तर पथदर्शक आहात.
तुमच्या ७५ वर्षांच्या यशस्वी जीवनप्रवासाला मानाचा मुजरा..!!!
शुभेच्छुक,
आपले स्नेही, गावकरी, समाजबांधव आणि सहकारी