नागपूर येथे झालेल्या वुडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया (WbAI) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हेमंत पयेर यांची तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात वुडबॉल खेळाची लोकप्रियता व खेळात नवे बदल घडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हेमंत पयेर हे वुडबॉल खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असून, त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर A-लेव्हल पंच व प्रशिक्षक म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले आहे. भारतात होणाऱ्या आंतर-भारतीय विद्यापीठ स्पर्धा व राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये त्यांनी तांत्रिक समितीवर महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.तसेच देशात वूडबॉल खेळाचा प्रचार आणि प्रसारात योगदान दिले आहे. याची दखल घेऊन त्यांची निवड केली असल्याचे संघटनेचे महासचिव अजय सोनटक्के यांनी सांगितले.
या सभेला वुडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष आमदार आशिष देशमुख, महासचिव अजय सोनटक्के, वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर बागडे, कुमार मसराम, खजिनदार प्रवीण मानवटकर, सीईओ सुदीप मानवटकर तसेच देशभरातील सर्व राज्य संघटनांचे सचिव उपस्थित होते.
हेमंत पयेर यांच्या या नियुक्तीमुळे वुडबॉल खेळ नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल वुडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.