शिमगोत्सव आला की कोकण जिवंत झाल्यासारखं वाटतं…. अस का होत असावं? कदाचित गावाच्या ओढीने रेल्वे, बस, रस्ते चाकरमान्यांनी भरून जातात. वर्षभर कुलूपबंद असलेली घरं उघडतात, देवळांत गजबज वाढते, आणि सोशल मीडियावर कोकणच्या लोककलेचा, परंपरेचा महापूर उसळतो.
पण हा उत्साह पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो.
जर कोकण इतकं जिवंत आहे, तर उरलेले दहा महिने ते ओस का असावं?
शिमग्यासाठी गावात येणारा चाकरमानी हा कुणी पर्यटक नाही. किंवा तो हौसेने गाव सोडून गेलेला माणूसही नाही; तो रोजगाराअभावी गावाबाहेर ढकलला गेलेला नागरिक आहे. गाव त्याचं आहे, पण पोट शहरात आहे हीच कोकणाची शोकांतिका आहे.
कोकणात निसर्ग आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. पण रोजगार नाही. शेती अजूनही निसर्गावर अवलंबून आहे. प्रक्रिया उद्योगांचा अभाव आहे. स्थानिक तरुणांसाठी टिकाऊ संधी निर्माण करण्यात शासन अपयशी ठरलं आहे. त्यामुळे “गावाकडे चला” हे सल्ले भावनिक वाटतात, पण वास्तवात ते पोकळ ठरतात.
आज सोशल मीडियावर कोकणची संस्कृती झळकते, पण प्रत्यक्ष गावात बंद घरं, वृद्ध आई-वडील आणि तरुणांची अनुपस्थिती दिसते. लोककला टिकतेय, पण लोक कोकणात टिकत नाहीत. परंपरा आहेत, पण पुढची पिढी गावात नाही. हे सामाजिक अपयश नाही; हे थेट प्रशासनाचं आणि धोरणात्मक दुर्लक्षाचं अपयश आहे.
याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला आजही पालकमंत्री नसणं ही बाब गंभीर आहे. निवडणूक होऊन वर्ष उलटले, तरीही हा प्रश्न प्रलंबित राहतो, याचा अर्थ स्पष्ट आहे, कोकण विकासाच्या प्राधान्यक्रमात नाही. पालकमंत्री नसणं म्हणजे केवळ एक पद रिकामं असणं नाही; तर रायगड वासीयांच्या प्रश्नांना वाली नसणं, निर्णयांना दिशा नसणं आणि विकासाला ब्रेक लागणं आहे.
मुंबई आणि शहरी महाराष्ट्र उभा राहिला तो कोकणच्या जमिनीवर आणि तुमच्या आमच्या श्रमांवर. पण आज त्याच कोकणातला तरुण रोजगारासाठी बाहेर भटकतो. राज्याला कोकण जमीन म्हणून, पर्यटन म्हणून हवं आहे; पण कोकणचा माणूस धोरणांच्या केंद्रस्थानी नाही हीच खरी विसंगती आहे.
सण गाव भरतात, हे खरं. पण गाव टिकवायचं असेल, तर सण पुरेसे नाहीत. स्थलांतर थांबवायचं असेल, तर स्थानिक रोजगारनिर्मिती, उद्योग, कृषी प्रक्रिया आणि दीर्घकालीन धोरणांची गरज आहे.
शिमगोत्सव आनंद देतो, पण तो प्रश्नही विचारायला लावतो “कोकण फक्त सणापुरतं जिवंत ठेवायचं आहे, की कायमचं?”
या प्रश्नाचं उत्तर केवळ उत्सवात नाही; ते प्रशासनाच्या इच्छाशक्तीत आहे. नाहीतर शिमग्याची आग पेटत राहील, आणि त्या आगीभोवती उभं राहायला हळूहळू कोणी उरणारच नाही.
- भावेश जनार्दन म्हसकर,
खरसई, म्हसळा


