प्रतिनिधी नवी मुंबई
नवी मुंबईतील राजीव गांधी स्टेडियम, सीबीडी बेलापूर येथे ८ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत पहिली इंडियन वूडबॉल लीग भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील नामांकित खेळाडू, प्रशिक्षक व अधिकारी या स्पर्धेत सहभागी होऊन भारतातील पहिल्या व्यावसायिक वूडबॉल लीगचे साक्षीदार ठरणार आहेत.
वूडबॉल हा वेगाने लोकप्रिय ठरणारा कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकार आहे. ऑलिंपिक कौन्सिल ऑफ आशियाची मान्यता प्राप्त असलेल्या या क्रीडाप्रकाराचा समावेश एशियन बीच गेम्स, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स आणि वर्ल्ड मास्टर्स गेम्ससह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आहे. भारतात या क्रीडाप्रकाराला अद्याप अधिक प्रोत्साहन व संधींची आवश्यकता असून, या स्पर्धेमुळे भारतीय वूडबॉलच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
पुरुष आणि महिला दोन्ही गटांत सिंगल्स व टीम इव्हेंट्समध्ये सामने घेण्यात येतील. विजेत्यांना ट्रॉफी, पदक आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच वूडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा पार पडेल.
“भारतामध्ये वूडबॉलचा भक्कम पाया घालण्याचे आमचे ध्येय आहे. या लीगमुळे खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळेल तसेच क्रीडाप्रकाराला राष्ट्रीय पातळीवर अधिक ओळख मिळेल, नवी मुंबई या प्रवासाची उत्तम सुरुवात ठरणार आहे.” असे डॉ.आशिष देशमुख, अध्यक्ष, वूडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सांगितले.
“कुशल व्यवस्थापन आणि दर्जेदार सामने देण्याचा आमचा मानस असून या स्पर्धेतून भारतीय वूडबॉलची खरी ताकद दिसून येईल.देशभरातून मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.” असे इंडियन वूडबॉल लीग आयोजन समिती सचिव डॉ. हेमंत पयेर यांनी सांगितले.
भारतात वूडबॉल क्रीडेला अधिक संधी मिळाव्यात, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि शाळा-विद्यापीठांमध्ये या क्रीडाप्रकाराचा विस्तार व्हावा हा या लीगचा मुख्य उद्देश आहे.
नवी मुंबईने क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून, राजीव गांधी स्टेडियम हा या ऐतिहासिक स्पर्धेसाठी योग्य मंच ठरणार आहे. यावेळी प्रेक्षकांसाठी सामने पाहण्यासोबतच वूडबॉलबाबत जागरूकता वाढवणाऱ्या उपक्रमांचाही समावेश करण्यात येणार आहे.
पहिली इंडियन वूडबॉल लीग हा केवळ एक क्रीडा उपक्रम नसून, भारतात वूडबॉलच्या सशक्त भविष्याची सुरूवात आहे.













