नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या स्थानिक ग्रामदेवतांचा समृद्ध वारसा आता एका संशोधनपर पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. लेखक गज आनन म्हात्रे यांनी संकलित व सादर केलेले ‘नवी मुंबईच्या प्राचीन ग्रामदेवता’ हे पुस्तक रविवार, ८ जून रोजी कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शिक्षण संकुलात प्रकाशीत होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन नवरंग साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ यांच्या पुढाकाराने पार पडणाऱ्या रंगधनु नवरंग साहित्य संमेलन अंतर्गत करण्यात आले आहे. या एकदिवसीय संमेलनात पुस्तक प्रकाशनासह विविध साहित्यिक उपक्रम होणार असून कवी संमेलन, परिसंवाद आणि गौरव सोहळाही यावेळी रंगणार आहे.
गज आनन म्हात्रे लिखित या पुस्तकात नवी मुंबई परिसरातील सुमारे साठ ग्रामदेवतांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक माहिती विस्ताराने मांडण्यात आली आहे. शहराच्या निर्माणपूर्व काळात म्हणजे उरण, वाशी, नेरूळ, बेलापूर, ऐरोली आदी परिसरांतील शेतवस्ती, डोंगरपायथा, खाडी किनारा, जंगलभाग आणि गावकुसांमध्ये पूजल्या जाणाऱ्या ग्रामदैवतांच्या मूळ कथा, मंदिरांचे स्वरूप आणि स्थानिक श्रद्धेचा इतिहास या पुस्तकात अभ्यासपूर्ण रीतीने नमूद केला आहे.
या साहित्य संमेलनात माजी आमदार संदीप नाईक, साहित्यिका प्रतिभा सराफ, इतिहास अभ्यासक सदाशिव टेटवीलकर, तसेच नामवंत साहित्यिक कौमुदी गोडबोले, वृषाली मगदुम, संगीता जोशी, एल. बी. पाटील, देविदास पोटे, अविनाश पाटील, रविकिरण पराडकर, चंद्रकांत पाटील, काशिनाथ मढवी यांच्यासह अनेक कवी, अभ्यासक आणि रसिक सहभागी होणार आहेत.
या पुस्तकाच्या माध्यमातून नवी मुंबईचा पारंपरिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक चेहरा नव्याने समोर येणार असून नव्या पिढीसाठीही हे एक मौल्यवान दस्तऐवज ठरणार आहे. स्थानिक इतिहासावर अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण स्रोत ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स: #नवीमुंबई #ग्रामदेवता #गजआननम्हात्रे #रंगधनु #मराठीसाहित्य #इतिहास #ग्रंथप्रकाशन #MahamulbiNews