Election 2024 : भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार? मविआ काय खेळी करणार? नवी मुंबईतील ४ मतदारसंघाचं गणित समजून घ्या
navi Mumbai vidhan Sabha election 2024 : नवी मुंबई पोलीस आयुक्तालाय क्षेत्रात एकूण ४ विधानसभा क्षेत्र आहेत. बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण या चारही विधानसभेवर भाजपाचे आमदार निवडून आलेत.
बेलापूर मध्ये मंदा म्हात्रे, ऐरोलीत गणेश नाईक, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर आणि उरणमधून महेश बालदी विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत या चारही विधानसभेच्या जागांवर निर्विवाद वर्चस्व असल्याने एकतर्फी विजय मिळवण्यात या आमदारांना यश आले होते. मात्र यंदा महाविकास आघाडीचे मोठे आव्हान राहणार आहे.
बेलापूर विधानसभासाठी दिग्गज मैदानात
नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आहेत. 2014 साली दिग्गज नेते गणेश नाईक यांचा पराभव करत मंदा म्हात्रे जायंट किलर म्हणून समोर आल्या होत्या. 2019 साली दुबळ्या विरोधकांचा मंदा म्हात्रे यांच्यासमोर सुगावा लागला नाही. असे असले तरी यंदा भाजपा तिसऱ्यांदा मंदा म्हात्रे यांना संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेलापूर मधून भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे देखील इच्छुक असून त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. भाजपामध्येच तिकिटासाठी रस्सीखेच असताना मित्र पक्ष शिवसेना देखील बेलापूर मतदार संघावर दावा करत असून शिवसेना उपनेते विजय नाहटा उमेदवारी मागत आहेत. उमेदवारी नाकारल्यास विजय नाहटा अपक्ष निवडणुकीला सामोरे जातील असा देखील निर्धार विजय नाहटा यांच्याकडून व्यक्त करण्यात येत असून यामुळे महायुतीमध्येच मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. दुसरीकडे महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, समाजसेवक डॉ मंगेश आमले आणि डॉ शिवदास भोसले इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे आणि काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक देखील इच्छुक असून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचाराला लागलेत.
ऐरोलीमध्ये भाजपा आमदार गणेश नाईकांना काँग्रेसचा युवा नेता देणार आव्हान
ऐरोली विधानसभेचे विद्यमान आमदार भाजपचे गणेश नाईक आहेत. नवी मुंबईतील दिग्गज नेते माजी मंत्री गणेश नाईक यांनी ऐरोली मतदार संघावर पुन्हा एकदा आपला दावा केलाय. मात्र त्यांना आव्हान मित्र पक्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी दिलेय. शिवसेनेने देखील ऐरोली विधानसभेची जागा मागितली असून बेलापूर मधून भाजपचे जिल्हाध्यक्ष उमेदवारी मागू शकतात तर ऐरोली मधून शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष उमेदवारी का मागू शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. याशिवाय महाविकास आघाडीने देखील मोठा जोर ऐरोली मतदार संघात लावला असून युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी ऐरोलीतुन उमेदवारीची मागणी पक्षाकडे केलेय. नाना पटोले यांच्या उपस्थितीत केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे अनिकेत म्हात्रे यांचे तिकीट निश्चित मानले जातं असले तरी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. यामुळे दिग्गज नेते गणेश नाईकांसमोर युवा नेते अनिकेत म्हात्रे कसा लढा देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांना शेकापचे आव्हान?
मागील 3 टर्म पनवेल विधानसभेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे प्रशांत ठाकूर यंदा चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. भाजपाला विरोधकांची कमी आणि स्वपक्षियांची जास्त चिंता सतावतेय. कारण प्रशांत ठाकूर यांच्यामागे भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांना देखील बळ देतंय. दुसरीकडे ठाकुरांचे वर्चस्व मोडीत काढणे विरोधकांच्या अवाक्या बाहेर जाताना दिसतंय. शेकाप शहरी भागात चालत नाही, शिवसेना ठाकरे गटाकडे आश्वासक चेहरा नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही वर्चस्व नाही त्यामुळे माजी आमदार बाळाराम पाटील यांना पनवेल मधून उमेदवारी देऊन विधानसभा चुरशीची बनविण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
उरणमध्ये महेश बालदी विरोधात शेकाप उतरवणार हुकमी एक्का
उरण मतदार संघात विद्यमान भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार महेश बालदी आहेत. शिवसेना भाजपा युती असताना देखील शिवसेनेचे तत्कालीन आमदार मनोहर भोईर यांच्या विरोधात बंडखोरी करत उरण मतदार संघावर त्यांनी विजय मिळवला होता. आताची परिस्थिती मात्र महेश बालदी यांच्यासाठी मागील निवडणुकी प्रमाणे सकारात्मक नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि शेकाप मध्ये झालेल्या मत विभाजनाचा महेश बालदी यांना फायदा झाला होता. यंदा महाविकास आघाडी म्हणून शेकाप,शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार असून शेकाप तर्फे युवा नेते प्रीतम म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.