२१ जून… एक असा दिवस, जो आता केवळ कॅलेंडरवरील एक तारीख राहिलेली नाही, तर तो बनलाय शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीचा जागतिक उत्सव. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो. योग ही केवळ व्यायामप्रणाली नसून, ती जीवन जगण्याची एक सुंदर आणि शाश्वत जीवनशैली आहे. आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित जीवनात योग म्हणजेच आत्मशांतीचा आणि आरोग्याचा मंत्र आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात बघता योगाला भारतात
हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे. मात्र त्याला वैश्विक व्यासपीठावर ओळख भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मिळवून दिली. त्यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत योगाच्या जागतिक महत्त्वावर भाष्य करत २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला आणि ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा ‘International Day of Yoga’ म्हणून मान्यता दिली. त्यानुसार 21 जून 2015 ला पहिला आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. तसेच २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस (Summer Solstice) असतो, जो प्रकाश, उर्जा आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानला जातो. पतंजली यांनी आपल्या योग सूत्रांत मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यांनी लिहलेला ‘योगसूत्र’ ग्रंथ हा योग सिद्धांत आणि त्यावरील अभ्यास यावरील महत्वपूर्ण आहे.
“योगः कर्मसु कौशलम्” – भगवद्गीतेतील हे वाक्य म्हणजे योगाचे सार. ‘योग’ हा शब्द ‘युज’ (संस्कृत) धातूपासून बनला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे– शरीर, मन आणि आत्मा यांचे परस्परांशी, तसेच विश्वाशी एकरूप होणे. योग म्हणजे आसन (शारीरिक स्थिरता), प्राणायाम (श्वास नियंत्रण), ध्यान (मनःशांती),
धारणा व समाधी (आध्यात्मिक उन्नती) होय. योग शारीरिक व्यायामाची पद्धत नाही, तर ती एक जीवनशैली आहे जी आपल्याला अंतर्मुख करून व्यक्तीला आपल्या शरीराचे, मनाचे आणि भावनांचे भान शिकवते.
जगभरात योग दिनाचे महत्त्व बघता दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी एक विशिष्ट थीम ठरवली जाते. 2025 मध्ये Yoga For One Earth One Health ही थीम ठरवली आहे. प्रत्येक वर्षातील थीम योगाचे अनन्यसाधारण महत्व स्पष्ट करते.
योगाचे जीवनातील महत्त्व
1) शारीरिक लाभ:
रोगप्रतिकारशक्ती वाढवतो
मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाबावर नियंत्रण,
शरीरातील लवचिकता, स्नायूबल आणि संतुलन वाढवतो
2) मानसिक लाभ:
चिंता, नैराश्य, तणाव कमी करतो. मनःशांती आणि निर्णयक्षमता वाढते, झोप सुधारते.
3) आध्यात्मिक लाभ:
स्व-चिंतन आणि आत्मसाक्षात्कार, मूल्यनिष्ठ जीवन, अहंकारशून्यता व समत्वभाव निर्माण करतो.
जगासाठी योग म्हणजे भारताची देणगी ठरली आहे. आज जगात जवळपास १८० हून अधिक देशांमध्ये योगप्रशिक्षण केंद्रे आहेत. योग ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ ठरली आहे. बॉलिवूड, हॉलिवूडपासून ते कॉर्पोरेट वर्ल्डपर्यंत सर्वत्र योगाची दखल घेतली जात आहे. तसेच भारतीय योग गुरूंमुळे याची जागतिक व्याप्ती वाढली आहे.
२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन ही केवळ एक तारीख नाही, तर ती आपल्या अंतर्मनाशी नाते जोडणारा दिवस आहे. आपण फक्त एक दिवस नाही, तर रोज वीस मिनिटे का होईना, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे.
योग आपल्याला आजारमुक्त, तणावमुक्त आणि समाधानयुक्त आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो. उत्तम आरोग्य ही एक यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
✍️ लेखन:- डॉ. विजय सु. निमजे
मोबाईल क्र. 8007280264