देशभरात दिवाळी जल्लोषात साजरी केली जात आहे. फटाके फोडून सर्वचजण आनंद लुटताना दिसत आहेत. तसेच तर राजकारणातही फटाके फुटताना दिसत आहे.
सर्वत्र दिवाळीचा जल्लोष सुरू असतानाच भाजपचे नेते, आमदार प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर भाष्य करून राजकीय सुरसुरी सोडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून आगामी काही दिवस राज्याचं राजकारण या चर्चे भोवती फिरण्याची शक्यताही दिसत आहे.
आमदार प्रसाद लाड यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं भाष्य केलं. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी भाजप बद्दल वक्तव्य केली, त्यामुळे भाजप परत कधी उद्धव ठाकरेंना सोबत घेईल, असं मला वाटत नाही, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासोबत कधीही युती न करण्याचा निर्णय घेतलाय का? अशी चर्चा या निमित्ताने केली जात आहे. उद्धव ठाकरे हे ठाण्यात, ठाणेकरांची दिवाळी खराब करण्यासाठी गेले होते. काळे झेंडे दाखवले तेव्हा हे सगळे पळून गेले. दिवाळीतला फुसका बार निघाला, अशी टीकाच त्यांनी केली.
आदित्यही त्यांच्या नादाला लागलाय
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. मला वाटतं संजय राऊत यांना काही तरी झालंय. ते राजकीय भविष्यवाणीही व्यवस्थित करत नाही. केवळ मीडिया अट्रॅक्शनसाठी आणि उरलेले आमदार टिकवण्यासाठी सरकार पडणार अशी भविष्यवाणी करत आहेत. त्यांच्या नादाला आता आदित्य ठाकरे पण लागलाय, अशी टीका त्यांनी केली.
तारतम्य बाळगा
यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांवरही भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: आरक्षण देणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत तरी मनोज जरांगे यांनी शांत राहिलं पाहिजे. बंधू म्हणून माझी त्यांना विनंती आहे. राजकीय स्टंट करू नका. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे वातावरण बिघडवण्याचं काम करू नका. दिवाळीच्या दिवशी अशी विधाने करून वातावरण खराब होतं. राज्याचं वातावरण खराब होतं. म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी अशी भाषा वापरू नये. बोलताना तारत्मय बाळगावा; असा सल्लाही लाड यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे.
करताकरविता बारामतीत
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. त्यांना आम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांचा मालक अडीच वर्ष घरात बसून होता. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रश्न विचारला पाहिजे. काँग्रेसमध्ये सहा ते सात मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांना आरक्षणावर विचारावं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. ते हायकोर्टात टिकलं. सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होते. त्यांना कुणी प्रश्न विचारत नाही. यामागचा करताकरविता बारामतीतला आहे, असा दावाही त्यांनी केला.
आकर्षक रोषणाई…
प्रसाद लाड यांच्या घरी दिवाळीनिमित्त विशेष रोषणाई करण्यात आली आहे. घरात अयोध्येची प्रतिकृती करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ही दिवाळी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रभू रामचंद्र दिवाळीतच वनवास संपवून घरी आले होते. त्यामुळे हिंदू म्हणून आमच्यासाठी हा दिवस अभिमानाचा आहे. म्हणूनच आम्ही प्रभू रामचंद्राची प्रतिमा घरात विराजमान केली आहे, असं लाड म्हणाले.