मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून (ता. 03 सप्टेंबर) या संपाला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी (ता. 04 सप्टेंबर) या संपाचा दुसरा दिवस असून दुपारी 12 वाजेपर्यंत एसटीच्या राज्यभरातील 251 आगारापैकी 96 आगार पूर्णतः बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
पण एकीकडे हा संप सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (ST Driver Recruitment In the strike of ST employees corporation issued new advertisement)
एसटी कर्मचारी संघटनांचा संप सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक पदासाठी भरती असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चालक पदासाठी काढण्यात आलेल्या या जाहिरातीनुसार एसटी महामंडळात होणारी भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांनाही सहभाग घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या जाहिरातीतील अटीनुसार, चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना आणि पी.एस.व्ही. बॅच असणे आवश्यक आहे. यासह, किमान एका वर्षाचा अवजड वाहन चालविण्याचा अनुभवही असावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
तसेच, या अटींची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसांच्या आत महाव्यवस्थापक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांच्याकडे आपली मागणी नोंदवणे आवश्यक आहे, अशी माहिती या जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर, कंत्राटी पद्धतीने ही भरती करण्यात येणार असल्याने याबाबत ही या जाहिरातीतून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर का ही भरती आता संपामध्येत करण्यात आली तर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यात येणार की काढण्यात येणार? असा प्रश्न या निर्माण झालेला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट पाच हजार रुपये मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. पण यामुळे संपाच्या पहिल्या दिवशी 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे.