सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी- सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
प्रसाद पारावे , समालखा, 6 ऑक्टोबर, 2024:- या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. त्यांची भाषा, वेशभूषा, आहार, जात, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहे. या सगळ्या विभिन्नता असूनही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आपण सर्व मनुष्य आहोत. आपला वर्ण कोणताही असो, वेशभूषा कशीही असो, देश कोणताही असो किंवा खाणे-पिणे कसेही असो; सर्वांच्या धमण्यांमध्ये एकसारखेच रक्त वाहत आहे आणि सगळे एकसारखाच श्वास घेत आहेत. आपण सर्व परमात्म्याची लेकरं आहोत. हीच भावना अनेक संतांनी वेगवेगळ्या समयी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भाषेतून आपापल्या शैलीमध्ये ‘समस्त संसार, एक परिवार’ या संदेशाच्या रूपात व्यक्त केली. मागील सुमारे 95 वर्षांपासून संत निरंकारी मिशन हाच संदेश केवळ प्रेषित करत आहे इतकेच नव्हे तर अनेक सत्संग आणि समागमांचे नियमितपणे आयोजन करुन या संदेशाचे जीवंत उदाहरण प्रस्तुत करत आहे.
मिशनचे लक्षावधी भक्त यावर्षीही 16, 17 आणि 18 नोव्हेंबर, 2024 रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे होऊ घातलेल्या 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये पोहचून मानवतेच्या महाकुंभमेळ्याचे दृश्य साकार करणार आहेत. देश-विदेशातून येणारे भक्तगण जिथे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांचे पावन दर्शन घेऊन कृतार्थतेचा अनुभव घेतीलच, शिवाय एकोप्याने संत समागमातील शिकवणूकीतून आपली मनं उज्ज्वल करण्याचाही प्रयास करतील.
या संत समागमाची भूमी समागमासाठी तयार करण्याच्या सेवेचा शुभारंभ आज 6 ऑक्टोबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी मिशनच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य, केंद्रीय सेवादल अधिकारी आणि सत्संगचे हजारो अनुयायी उपस्थित होते. उल्लेखनीय आहे, की 600 एकर जमीनीवर पसरलेल्या या विशाल समागम स्थळावर लाखो संतांची राहण्याची, भोजनाची, आरोग्याची तसेच जाण्या-येण्यासहीत अनेक प्रकारच्या व्यवस्था केल्या जातात ज्यासाठी अनेक ठिकाणांहून भक्तगणे येऊन महिनाभर निष्काम भावनेने सेवारत राहतात. या पावन संत समागमामध्ये सर्व थरातील संत व सेवादार भक्तगण आपल्या आप्तजनांसहित सहभागी होऊन एकत्वाच्या या दिव्य रुपाचा आनंद प्राप्त करतील. यावर्षीचा संत समागमाचा मुख्य विषय आहे – विस्तार, असीम की ओर (विस्तार, अनंताच्या दिशेने).
सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी- सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
समागम सेवेच्या शुभरंभ प्रसंगी आयोजित विशाल सत्संग समारोहाला संबोधित करताना सतगुरु माताजी म्हणाल्या, की सेवा करताना सेवेकडे भेदभावाच्या दृष्टिने पाहू नये तर निरिच्छत, निष्काम भावनेने सेवा करायला हवी. सेवा तेव्हाच वरदान ठरते जेव्हा त्यामध्ये कोणताही किंतु, परंतु नसतो. सेवेसाठी कोणत्याही काळावेळाचे बंधन असू नये. समागमाच्या दरम्यान किंवा समागम संपेपर्यंतच सेवा करायची आहे असे नाही तर पुढील संत समागमापर्यंत सेवेची ही उत्कट भावना कायम टिकून राहायला हवी. ही तर निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. सेवा नेहमीच सेवाभावनेने युक्त होऊनच करायला हवी. असे केल्याने आपण शारीरिक रुपाने असमर्थ असलो तरीही सेवा कबूल होते. कारण ती सेवाभावनेने युक्त असते.
निरंकारी संत समागम, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक भक्त वर्षभर करतात तो एक असा दिव्य उत्सव आहे जिथे असीम प्रेम, असीम करुणा, असीम विश्वास आणि असीम समर्पणाचा भाव असीम परमात्म्याच्या ज्ञानाच्या आधाराने सुशोभित होतात. मानवतेच्या या उत्सवामध्ये समस्त धर्मप्रेमींचे स्वागत आहे.