महामुंबई प्रतिनिधी |
समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षणात, आणि शिक्षणाला प्रेरणादायी स्वरूप देण्याची परंपरा खरसई आगरी समाजाने कायम जपली आहे. या सातत्याला उजाळा देणारा विद्यार्थी गौरव सोहळा नुकताच मुंबईत रंगला… आणि उजळलेल्या चेहऱ्यांवर यशाचा तेजोमय झळाळ, डोळ्यांत स्वप्नांची नवी किनार आणि मनात समाजाप्रती कृतज्ञतेचा झरा — अशी प्रेरणादायी झलक दिसली ती खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई (रजि.) आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२४–२०२५ मध्ये. रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी फुलपाखरू मैदान, मागाठाणे बस डेपो समोर, बोरीवली (पूर्व) येथे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात पार पडला.
सहकार्य आणि मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे यश हे समाजातील एकतेचे, शिक्षणाविषयी असलेल्या आदराचे आणि संस्कारांच्या परंपरेचे सुंदर प्रतीक ठरले. ठम मधली आळी मंडळ, मुंबईचे सदस्य तसेच भरत घाणेकर मित्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष सन्मा. श्री भरतजी रामचंद्र घाणेकर आणि विघ्नेश आर्ट्सचे संस्थापक कु. वरुण महेश घाणेकर यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला विशेष उठाव प्राप्त झाला. समाजातील जेष्ठ-श्रेष्ठ मान्यवर, आजी-माजी कार्यकारिणी सदस्य आणि समाजबांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा सन्मान केला. या प्रसंगी घाणेकर परिवाराच्या कुटुंब प्रमुख सन्मा. श्रीमती रुख्मिणी रामचंद्र घाणेकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास आत्मीयतेचा स्नेहस्पर्श लाभला.

प्रेरणादायी मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यासाठी सन्मा. श्री मिलिंदजी साटम (सलग दोन टर्मसाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य) आणि सन्मा. श्री मनोहरजी जाधव (कौन्सिलिंग सायकॉलॉजी तज्ज्ञ; २००६–२०११ SNDT महिला महाविद्यालय, मालाड येथे कार्यरत; २०१२ पासून UGC Advisory Committee चे सल्लागार) यांनी व्यासपीठावरून प्रभावी विचार मांडले. त्याचप्रमाणे श्री काशिनाथ रामा पयेर, चंद्रकांत कानू खोत इत्यादिंनी त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित तरुणाईत नवचैतन्य निर्माण झाले. तसेच सन्मा. श्री परशुरामजी मांदाडकार यांनी समाजातील ऐक्य, प्रगती आणि संस्कार यांचा संदेश देत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच स्थानिक ठिकाणाहून श्री काशिनाथजी मांदाडकर यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती दाखवली
उत्कृष्ट नियोजन
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन सन्मा. श्री महेशदादा रामचंद्र घाणेकर यांनी अत्यंत मनोभावे केले. त्यांच्या नेतृत्वात कार्यक्रम शिस्तबद्ध, उबदार आणि उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
मंडळाचे नेतृत्व आणि यशस्वी व्यवस्थापन:
या यशस्वी सोहळ्याच्या आयोजनात खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई (रजि.) च्या कार्यकारिणीचे कणखर नेतृत्व दिसून आले. अध्यक्ष सन्मा. श्री परशुराम भांजी माळी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली, सचिव सन्मा. श्री मनोज लक्ष्मण माळी यांनी कार्यक्रमाचे सूत्र अत्यंत व्यवस्थित सांभाळले. तर, खजिनदार सन्मा. श्री नारायण चांगू मेंदडकर यांनी आर्थिक व्यवस्थापनाची धुरा समर्थपणे पेलली. या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक सदस्याने, तसेच समाजातील अनेक उत्साही तरुण कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. श्री यशवंत नथुराम शितकर व श्री गिरीश बाळाराम पाटील, मनोज कानू म्हात्रे यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि प्रत्येक समाजबांधवाच्या सक्रिय सहभागामुळे हा विद्यार्थी गौरव सोहळा केवळ यशस्वी नाही, तर एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय सोहळा ठरला.
खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई (रजि.) तर्फे संपूर्ण घाणेकर परिवाराचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन व्यक्त करण्यात आले. या सोहळ्याने केवळ विद्यार्थ्यांचा गौरव केला नाही, तर समाजातील शिक्षण, संस्कार आणि एकतेच्या परंपरेला नवसंजीवनी दिली.हा कार्यक्रम म्हणजे समाजातील नव्या पिढीच्या स्वप्नांना बळ देणारा, आणि संस्कारांच्या भूमीवर नवचैतन्य फुलवणारा खरा उत्सव ठरला.