श्रीवर्धनमध्ये प्लॅनेटेरियम प्रकल्पास हिरवा कंदील; ऑइल इंडिया लिमिटेडसोबत ऐतिहासिक करार
श्रीवर्धन नगरपरिषद आणि ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) यांच्यात प्लॅनेटेरियम प्रकल्पासाठी ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. हा करार कोकणातील विज्ञान शिक्षण, पर्यटन आणि आधुनिक सुविधा विकासाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल.
श्रीवर्धन नगरपरिषद आणि ऑइल इंडिया लिमिटेड यांच्यात झालेला प्लॅनेटेरियम प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार केवळ कागदोपत्री घटना नसून, संपूर्ण कोकणातल्या विज्ञानप्रेमींसाठी आणि ताऱ्यांकडे कौतुकानं बघणाऱ्या बालमनासाठी आशेचा दीप आहे.
कोकणातल्या अनेक गावांमध्ये अंगणात झोपून, डोळ्यांनी आकाशातले तारे मोजणारी एक पिढी वाढली. त्यांना हे तारे फक्त लखलखते दिसायचे – पण आता त्यामागचं विज्ञान, त्यांचा आकार, रचना, हालचाल, ग्रह-नक्षत्रं… हे सगळं आता अनुभवता येणार आहे थेट श्रीवर्धनच्या नव्या प्लॅनेटेरियममध्ये!
या प्रकल्पामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण घेता येईल. स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ब्रह्मांडाची अद्भुत सफर करता येईल. प्लॅनेटेरियममुळे आकाशगंगेतील रहस्यांचा मागोवा घेणे आता केवळ पुस्तकापुरते न राहता, प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव होणार आहे.
हा प्रकल्प केवळ श्रीवर्धनपुरता सीमित न राहता, संपूर्ण रायगड जिल्हा आणि कोकणासाठी शैक्षणिक व पर्यटनदृष्ट्या नवसंजीवनी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. विज्ञानप्रेमी, विद्यार्थीवर्ग आणि पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार असून, भविष्यातील विज्ञानाधिष्ठित पर्यटन केंद्र म्हणून श्रीवर्धनची ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.