केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांना सुलभरित्या व एका छताखाली लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या विद्यमाने म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे तहसीलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (१३ जून) विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महसूल मंडळ मेंदडीमधील ६ महसूली सजामध्ये येणाऱ्या ३१ गावांकरिता आगरी समाज भवन मेंदडी येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार सचिन खाडे, निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत, नायब तहसीलदार मृणाली शिरसाट, श्रीकांत बिराजदार, अव्वल कारकून सलीम शहा, तालुका आरोग्य अधिकारी, दामोदर दिघीकर, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, सेंटरचालक, महसूल सेवक, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, रेशन दुकानदार व पोलीस पाटील हे उपस्थित होते. शिबिरामध्ये अॅग्रीस्टक योजनेत (शेतकरी नोंदणी) ४९, आयुष्यमान भारत कार्ड-९८, दुय्यम रेशन कार्ड (नाव समाविष्ट करणे व दुरुस्ती करणे) १८, संयागो लाभार्थी प्रकरण मंजुरी प्रमाणपत्र (श्रावणबाळ योजना)-३, नवीन मतदार नावे दुरुस्ती आणि नोंदणी-३, मोबाईल आधार लिंक-३०, उत्पन्न दाखले -१९, जातीचे दाखले ४, नॉन क्रिमिलेयर दाखले-१, वय अधिवासच्या ८ दाखल्यांचे वितर या शिबिरात करण्यात आले. संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १७ जून रोजी रा.जि.प. शाळा पाभरे (म्हसळा महसूल मंडळ विभाग) आणि १८ जून रोजी मराठा समाज हॉल खामगाव (खामगाव महसूल मंडळ विभाग) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले.