लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभेसाठी ‘एकला चलो’रेचा नारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसेनं 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करत असून उमेदवारांची चाचपणी करत आहेत.
यातच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा विधानसभेच्या मैदानात उतरू शकतात. त्यासाठी सेफ मतदारसंघाची निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांनी विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर निरीक्षकांनी अमित ठाकरे यांच्यासाठी ‘भांडुप’ मतदारसंघ सुरक्षित असल्याचा अहवाल पक्षाकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षाच्या बैठकीत अमित ठाकरे यांनी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे म्हटले होते. यानंतर पक्ष निरीक्षकांनी मनसेची ताकद असलेल्या मुंबई, ठाणे आणि पुण्यातील मतदारसंघाचा आढावा घेत अहवाल राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याकडे दिला होता.
आता निरीक्षकांकडून माहीम आणि मागाठाणेचीही चाचपणी करण्यात येत आहे. पण, अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही? याचा निर्णय राज ठाकरे घेणार असल्याचं बोललं जात आहे.
…तर राजकारणात यायला हवं
अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. “आपल्याला लोकांसाठी काही करायचं असेल, तर स्वत: संसदीय राजकारणात यायला हवं,” असं सांगत अमित ठाकरे यांनी विधानसभेसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवितात? निवडणूक लढणार की नाही? हे आगामी काळात स्पष्ट होईल.