खड्ड्यांवर ४० महिन्यांत ४० कोटींचा खर्च , तरीही नागरिकांचा खड्ड्यांतूनच प्रवास; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती
नवीन पनवेल | पनवेल महानगरपालिकेने रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी ४० महिन्यात तब्बल ४० कोटी ५८ लाख ४१ हजार २५७ रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक कोळवणकर यांनी ही माहिती दिली. हा खर्च खड्ड्यांसाठी केला आहे की ठेकेदारासाठी? असा प्रश्न दीपक कोळवणकर यांनी केला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. ४० कोटी खर्च करून देखील बहुतांशी रस्ते खड्ड्यातच आहेत. त्यामुळे हा खर्च पाण्यात गेला असल्याचे बोलले जात आहे. या पैशातून ठेकेदाराचे चांगभलं झालं असल्याचा आरोप केला जात आहे. एक एप्रिल २०२१ ते ३१ जुलै पर्यंत पनवेल महानगरपालिकेने पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी ४० कोटी ५८ लाख ४१ हजार २५७ रुपये खर्च केले आहेत.
एक एप्रिल २०२१ ते ३१ जुलै २०२२ पर्यंत पाच कोटी ६९ लाख ३७ हजार ६०५ रुपये खड्ड्यांवर खर्च केले. तर एक ऑगस्ट २०२२ ते एक एप्रिल २०२३ पर्यंत खड्ड्यांवर १६ कोटी नऊ लाख ९६ हजार ३७३ रुपये खर्च करण्यात आले. २ एप्रिल २०२३ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत सर्वाधिक १८ कोटी १९ लाख ७ हजार २६९ रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे पालिकेने नागरिकांच्या कररुपी पैशाची खड्ड्यांवर आणि ठेकेदारावर उधळण केली असल्याचे बोलले जात आहे. पनवेल महापालिका हद्दीत खारघर, नवीन पनवेल, कामोठे, पनवेल आदी परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. एप्रिल २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत खारघरमध्ये सर्वाधिक सहा कोटी ७१ लाख ७६ हजार रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले.
याच १५ महिन्यात पनवेलमध्ये चार कोटी, सत्तावीस लाख, तीस हजार रुपये, नवीन पनवेलमध्ये दोन कोटी पाच लाख ९६ हजार रुपये, कामोठेत २ कोटी ३७ लाख ९६ हजार रुपये तर कळंबोलीत तीन कोटी, छत्तीस लाख सहा हजार रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. मात्र तरीदेखील येथील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत.
शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजवले नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे खड्ड्यांवरील पैसा गेला कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. पालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी अनेक पक्षांनी पालिकेकडे केली होती. मात्र हे खड्डे भरणे म्हणजे केवळ थूकपट्टी असल्याचा आरोप केला जात आहे. कर भरून देखील पालिका हद्दीत नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.