लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये
Ladki Bahin Yojana – आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात चर्चेत आहे. या योजनेचा तिसरा हप्ता देण्यास रविवारपासून सुरूवात झाली आहे.
त्यातच नांदेड जिल्ह्यात सीएससी ऑपरेटरने कागदपत्रांमध्ये फेरफार करत लाखो रुपयांचा महाघोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, यापूर्वीही अनेक गैरप्रकार घडल्याने ही योजना वादात राहिलेली आहे.नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा गावात लाडक्या बहिणींच्या नावाने सीएससी ऑपरेटरने फसवणूक केली असून तो आता फरार आहे.
हदगावमधील सचिन कॉमन सर्विस सेंटर ऑपरेटरने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहे असे सांगून ओळखीच्यांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी केवायसीसाठीची कागदपत्रे जमा केली.
लाडक्या बहिणींचे अर्ज भरताना महिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकण्याऐवजी सीएससी चालकाने पुरुषांचे आधारकार्ड क्रमांक टाकले. खाते क्रमांकही पुरुषांचे दिले. जेव्हा लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झाले,
तेव्हा सीएससी चालकाने पुरुषांना तुमचे रोजगार हमीचे पैसे आले आहेत असे सांगून त्यांचे अंगठे घेऊन त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून घेतली.
मनाठा गावातील 38 तर बामणी फाटा येथील 33 पुरुषांचे आधार कार्ड वापरुन सचिन सीएससी चालकाने 3 लाख 19 हजार 500 रुपये परस्पर लाटल्याचे उघड झाले. सीएससी चालक सध्या फरार आहे.
समोर आलेली प्रकरणे दोन गावातील आहेत, सेंटर चालकाने आणखी किती लोकांची कागदपत्रे वापरुन पैसे उचलले याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोषींवर कारवाई करावी – सुप्रिया सुळे
या संबंधी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुळे यांनी ट्वीट करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत राबवलेल्या योजनेचा फायदा भलतीकडे होत आहे, असा आरोप केला. हे सगळं ठरवून चालले आहे का, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी ट्वीट टॅग केले आहे.