राज्यातील ७५ हजार गोविंदांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय महायुती सरकारने गुरुवार, दि. २५ जुलै रोजी घेतला. दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना अपघात किंवा दुर्घटना घडून दुर्दैवी मृत्यू आल्यास, २ अवयव किंवा १ डोळा निकामी झाल्यास, किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासनाकडून १० लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे.
एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. राज्यातील ७५ हजार गोविंदांसाठी शासनाने विम्याचे संरक्षण दिले आहे. वर्ष २०२३ मध्येही राज्यशासनाने गोविंदांना विम्याचे संरक्षण दिले होते.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, ब्रिगेडीअर सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिकांच्या विविध विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला. खारघर येथे माजी सैनिकांसाठी विश्रामगृह, मेस्को महामंडळामार्फत होणारे उपक्रम, माजी सैनिकांचे वेतन, मुंबईमध्ये संग्रहालय उभारणे, सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गावाला विशेष दर्जा देऊन तेथे विकासकामे करणे, माजी सैनिकांना टोल मध्ये सवलत आदी विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली.