म्हसळा : रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट देशातील एक प्रमुख वाहन निर्यात केंद्र म्हणून मोठ्या वेगाने विकसित होत आहे. मदरसन समूह आणि आदानी पोर्ट्स यांच्यामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारामुळे येथे अत्याधुनिक एक्सपोर्ट हब उभारले जाणार असून, या केंद्रातून दरवर्षी सुमारे दोन लाख वाहनांची निर्यात होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मुरुड तालुक्यातील आगरदांडा आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे उभारण्यात आलेल्या या बंदराचा विकास सध्या आदानी समूह करत आहे. बंदराच्या लगतच्या औद्योगिक परिसरात वाहन उद्योगाला नवीन चालना मिळेल, तसेच मुंबई–पुणे या महत्त्वाच्या वाहन उत्पादन पट्ट्याला निर्यातीसाठी जलद आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय उपलब्ध होणार आहे.
मदरसन समूहाच्या समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड आणि अदानी पोर्ट्स अँड एसईझेडच्या दिघी पोर्ट लिमिटेड या संयुक्त सहकार्यामुळे येथे आधुनिक रोल-ऑन, रोल-ऑफ (RO-RO) टर्मिनल उभारले जाणार आहे. तयार वाहनांचे स्टोअरेज, लॉजिस्टिक्स, पॅकिंग आणि एक्सपोर्टशी संबंधित सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण होणार असल्याने मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांची कार्यक्षमता लक्षणीय वाढणार आहे.
ग्राहकांसाठी रिअल-टाइम कार्गो ट्रॅकिंग सिस्टम देखील उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे निर्यात प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वसनीयता वाढेल. या प्रकल्पामुळे रायगड जिल्हा आगामी काळात देशातील एक प्रमुख ऑटोमोबाईल लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













